आज डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांचा ५७ वा महापरीनिर्वान दिवस आहे .आज चैत्यभूमी,दादर येथे,लाखोंच्या संख्येने भीम अनुयायी येणार.फक्त महाराष्ट्रामधूनच नाही तर संपूर्ण भारतातून येणार.बाबासाहेबांचा देह जिथे महासागराच्या साक्षीने विसर्जित केला गेला तिथे नतमस्तक होणार.आजच्या दिवशी एक नवीन चैतन्य भीम अनुयायांमध्ये संचारणार
भीम अनुयायायंचे जथे च्या जथे चैत्यभूमीवर येणार.बाबासाहेबांना अभिवादन करणार.आपल्या समजाच्या लाखोंच्या दर्शनाने प्रभावित होणार.मग जातायेताना चर्चा रंगणार.'आपला समाज इतका मोठा आहे .या समाजासारखा मोठा समाज कुणाचा नाही.मग तरीही आपण राजकारणात मागे का? आपण सगळे वेगवेगळ्या गटात वाटले गेलो म्हणून आपण मागे आहोत.आपण जर एक असतो ना तर काय कुणाची बिशाद होती आपल्याला हरवायची .आणि आपण सत्ताधारी झालो असतो.आपला मुख्यमंत्री असता.आणि त्याच्याही पुढे जाऊन कुणी म्हणेल आपला पंतप्रधान असता.आपले नेतेच स्वार्थी आहेत ते फक्त स्वताचा स्वार्थ बघतात .आणि स्वतःची खासदारकी आणि आमदारकी टिकवण्यासाठी इतर पक्षांच्या मागे लाचारासारखे स्वतः जातात.आणि समाजालाही घेऊन जातात.मग कुणी म्हणेल आपल्या समाजात लोक किती शिकले आहेत.हि बाबासाहेबांची पुण्याई आहे.बाबासाहेब नसते तर आपण आजही घाण कामे करत बसलो असतो.कुत्र्यामांजरा सारखे जीवन जगत असतो.आपल्याला कवडीची किंमत नसती.आणि लाचारीचे जगणे नशिबी आले असते.अन बाबासाहेबांमुळे आपण आज सन्मानाने जगत आहोत.चर्चा चर्चा आणि चर्चा बस्स.याशिवाय आपण करू तरी काय शकतो?
चर्चेमध्ये आपला हात कोणी धरू शकत नाहीत.इतर समाजांमध्ये कार्यकर्ता लवकर होत नाहीतआर नेता कुठे होणार? ;पण आपल्या समाजात घराघरात नेता असतो.बाबासाहेब म्हणाले होते,' सत्ताधारी जमात बना.'आपण खूप सिरीअसली घेतले आणि घराघरात नेते जन्माला.आले.प्रत्येक जन जन्मताच मोठा असतो .कोणी कोणाचे ऐकण्याच्या फंदात पडत नाही.प्रत्येक जन आपल्या मर्जीचा मालक असतो.ज्याच्या मनाला वाटेल तसा तो जगात असतो. त्याच्या जगण्याला दिशा नसते.तो कुठेही भरकटत जातो.आणि आपल्या समाजालाही स्वताबरोबर भरकटत नेतो.समाजही मेंढ्याच्या जातीचा बनला आहे,एक चालला कि दुसरा त्याच्यामागे जातो.कुठे चालला आहे.? का चालला आहे? आपला काही फायदा आहे का? काही विचार न करता अंधाप्रमाणे त्याच्या खांद्यावर हात ठेवून जात असतो.
आज बाबासाहेबांचे महापारीनिर्वान होऊन ५७ वर्ष होतायेत.आपण दरवर्षी चैत्यभूमीवर मोठ्या संखेने एकत्र येतो याशिवाय आपण बाबासाहेबांना काय दिले याचा कधी आपण विचार केला आहे का? बाबासाहेबांनी आपल्याला चार संस्था दिल्या आहेत .राजकारणासाठी 'रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया' .धार्मिक कार्यासाठी 'भारतीय बौद्ध महासभा',शैक्षणिक कार्यासाठी 'पीपल्स एजुकेशन सोसायटी ',आणि समाजाच्या संरक्षणासाठी 'समता सैनिक दल.' या चारही संस्थांचा आढावा घेतला आहे का कधी?
कोणत्या टप्प्यावर आहेत त्या आज? किती पुढार्यांनी किंवा समाजातील सधन लोकांनी शैक्षणिक संस्था काढल्या आहेत.कि ज्यातून बाबासाहेबांचा समाज शिकतो आहे.? किती लोक भारतीय बौद्ध महासभेचे सभासद आहेत? किती लोंकांना समता सैनिक दल माहित आहे? जास्त समाज हा राजकारणातच रममाण झालेला दिसतो.पण निम्यापेक्षा समाज हा इतर पक्षांचे झेंडे खांद्यावर घेण्यातच धन्यता मानताना दिसतो .मग ते कॉंग्रेसमध्ये दिसतील,राष्ट्रवादी कॉंग्रेस मध्ये दिसतील,शिवसेनेत दिसतील,मनसेत दिसतील. बीएसपीत दिसतील.पण बाबासाहेबांच्या रिपब्लिकन पक्षाचे काय? बाबासाहेबांनी समाजाच्या उत्कर्षासाठी रिपब्लिकन पक्षाची संकल्पना ठेवली होती.
रिपब्लिकन पक्षाच्या झेंड्याखाली समाजाने एक होणे आणि त्या बरोबर इतर समाजालाही एकत्र करणे हा बाबासाहेबांचा हेतू होता.पण इतर समाजाचे सोडाच पण बाबासाहेबांचा अनुयायी असणारा समाजही बाबासाहेबांच्या संकल्पनेतील पक्षात राहू शकला नाही. इतर पक्षाचे झेंडे उचलण्यात आणि त्यांना मोठे करण्यातच आपण धन्यता मानली.आणि आपण केलेल्या कामगिरीचे बक्षीस म्हणून एखादी आमदारकी,एखादी खासदारकी मिळण्यासाठी त्याच्या दारात चकरा मारू लागलो.प्रत्येकजण आपापल्या परीने त्यांचे पदरात काही ना काही पाडून घेण्याच्या इर्षेत समाजाचे काय हाल झाले याचे भान विसरला.आज इतर समाज जाऊ द्या पण बाबासाहेबांना मानणारे ,बाबासाहेबांचे अनुयायी जरी एकत्र आले.आणि एकविचाराने निवडणुकीला सामोरे गेले.तरी सत्ता ताब्यात घेऊ शकले नाहीत तरी सत्तेची चावी स्वताकडे ठेवू शकतात.हे बीएसपीने उत्तरप्रदेश मध्ये दाखुवून दिले आहे.जे बीएसपीला जमले ते रिपब्लिकनला जमू नये का? कालचा मनसे एका फटक्यात १३ आमदार निवडून आणतो.आणि पक्षाला स्वतःचे चिन्ह मिळवतो.पण आम्हाला ५७ वर्षात हे करता आले नाही .
त्या पक्षात आपले लोक मोठ्या संखेने आहेत हे जरी मान्य असले तरी ते त्या पक्षात का गेले याचा विचार आपण करणार आहोत कि नाही? आपल्या लोकांना एका झेंड्याखाली खेचण्याचा आपल्याला प्रयत्न करावा वाटत नाही हेच मोठे दुख आहे.
धार्मिक बाबतीत पाहिले तर बाबासाहेबांनी विषमता निर्माण करणारा ,माणसामाणसामध्ये तेढ निर्माण करणारा हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धम्म स्वीकारला .बाबासाहेबांनी आपल्याला हिंदू धर्माच्या गुलामगिरीतून बाहेर काढण्यासाठी २२ प्रतिज्ञा दिल्या .त्यातील एक प्रतिज्ञा आहे ,'मी गौरी गणपती ,दुर्गापूजा हे सन साजरे करणार नाही.'पण आजचे चित्र काय आहे ? तर जे लोक शिकले आहेत ते गौरी गणपती उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे करताना दिसतात.आपण हिंदू महार होतो तेंव्हा गणतीचे दर्शन घेणे म्हणजे पाप होते.आणि बौद्ध झालो तेंव्हा सर्व देवच झुगारून दिले त्यामुळे त्यांचा काही संबंधच नाही.तरीही गणपती उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्याची चढाओढच लागलेली दिसते.इतकेच काय तर आमचे मोठ्या हुद्द्यावर असणाऱ्या लोकांना जेंव्हा प्रमोशन मिळते तेंव्हा ते त्यांच्या कर्तुत्वावर विश्वास दाखवण्यापेक्षा सगळे श्रेय साईबाबा किंवा बालाजीला देतात आणि साई वारी किंवा बालाजी वारी हमखास करतात.
आणखी एक महत्वाची बाब म्हणजे ,हिंदू धर्मातून आपण बौद्ध झालो आहोत.आणि आता बरेच लोक बौद्ध धाम्मातून ख्रिस्ती धर्माकडे वळत आहेत.आणि आपण हे उघड्या डोळ्यांनी बघत आहोत.
या सर्व बाबी बाबासाहेबांना आवडल्या असत्या का? याचा विचार करण्याची आज वेळ आहे म्हणून बाबासाहेबांना अभिवादन करण्यापूर्वी स्वताला तपासून पहा कि आपण खरेच बाबासाहेबांच्या विचारधारेवर चालतो का? आपण त्यांचे स्वप्न साकार करू शकतो का?